आरोप
स्वातंत्र्यवीर सावरकर हे कट्टर हिंदुत्ववादी धर्मांध आणि कट्टर जातीयवादी ब्राह्मण आहेत.
वस्तुस्थिती
जातीयवादी ब्राह्मण ?
सावरकरांनी जातींचं उच्छेदन व्हावं यासाठी कार्य केलं त्या सावरकरांनाच आज जातीयवादी ठरवलं जात आहे. ते केवळ ब्राह्मण होते म्हणून वाट्टेल ती गरळ ओकली जात आहे. पण या तथाकथित बामणानं रत्नागिरीच्या १३ वर्षांच्या स्थानबद्धतेत अस्पृश्यता निर्मूलनाचं जे कार्य केलं त्याला तोड नाही.
अंदमानातून सुटका झाल्यावर रत्नागिरी, येरवड्याच्या तुरुंगात तीन वर्ष काढल्यावर, राजकारणात भाग घेणार नाही या अटीवर त्यांना १९२४ पासून पाच वर्षांसाठी रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आलं. कारावासात राहून ना देश स्वतंत्र होणार आहे, ना समाजकारण साधणार आहे या विचारानं त्यांनी स्थानबद्धता स्विकारली. त्याबाबतही त्यांच्यावर आगपाखड होत असते. उघडउघड राजकारण नाही साधलं तरी समाजकारण करेन आणि त्याआडून राजकारण साधेन, ही रणनीती ठरवूनच सावरकरांनी स्थानबद्धता स्विकारली.
त्याकाळी पारतंत्र्याच्या बेडयांबरोबरच हिंदू समाजाला सिंधुंदी, स्पर्शबंदी, व्यवसायबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, शुद्धीबंदी, वेदोक्तबंदी या सात बेडयांनी जखडले होते. हिंदूंच्या प्रगतीलाच खीळ घालणार्या या बेड्या तोडण्याचा निश्चय सावरकरांनी केला. पण त्यासाठी त्यांनी स्वत:च्या पायात मात्र ठोकून घेतली स्थानबद्धतेची बेडी.
सावरकरांच्या स्थानबद्धतेला केवळ सात वर्षच झाली असताना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी रत्नागिरीला भेट दिली होती. सावरकरांचं कार्य पाहून ते म्हणाले होते, “अस्पृश्यता निर्मूलनाचं कठीण, किचकट काम मी आयुष्यभर करत आलो. पण थोड्याच काळात या वीरानं अस्पृश्यता निर्मूलनाचं जे अफाट कार्य केलं आहे त्याचा किती गौरव करू असं मला झालं आहे. देवानं माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं.”
ज्यावेळी गांधी चातुर्वर्ण्याची महती गात होते आणि त्याविरुद्ध काही करणे पाप मानत होते तेव्हा सावरकर वर्णभेदाच्या, जातीभेदाच्या उच्छेदनाचा प्रयत्न करत होते. “प्रत्येक जातीचं एक वैशिष्ठ्य असतं, तेवढ्यापुरत्याच जाती ओळखल्या जाव्यात. परंतु कुठल्याही जातीने इतरांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानणे हि घोर चूकच आहे. अस्पृश्यतेच्या विषवृक्षाची मुळं म्हणजे हा जातीभेद. जोपर्यंत जातीभेदाच्या मुळांवर घाव घालणार नाही तोपर्यंत अस्पृश्यता नष्ट होणार नाही.” हे सांगणारे सावरकर हे केवळ ब्राह्मण म्हणून त्यांचा तिरस्कार केला जात असेल, द्वेष केला जात असेल तर तसा द्वेष करणारेच जातीयवादी ठरतात. ‘मनुष्यही एकच जात’ मानणारे सावरकर निश्चितच नाहीत.
अस्पृश्यांना हरिजनही म्हणू नये कारण आपण सगळेच हरिजनच आहोत. त्यांना पतीत म्हणू नये कारण आपण सगळेच पतीत आहोत. या विचारानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शेठ भागोजी शेठ कीर यांच्या सहयोगानं रत्नागिरीत पतितपावन मंदिर उभारलं, जे सवारसाठी खुलं झालं. केवळ देवळाच्या पायरीपर्यंतच जाऊ शकणार्या पूर्वास्पृश्यांना मंदिर प्रवेशच नाही तर गाभार्यात जाऊन पूजा करण्याचा मान सावरकरांनी मिळवून दिला.
रत्नागिरीत, सोवळ्याच्या बालेकिल्ल्यात ही क्रांती सहज शक्य नव्हती. तसंच जातीभेद हा केवळ उच्चवर्णीयात नव्हता तर संपूर्ण हिंदू समाजच या जातीभेदाने ग्रस्त होता आणि आजही आहे.
त्यामुळे सावरकरांसह या कार्यात सहभागी झालेल्यांना भरपूर विरोध झाला, त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला पण बहुतेक सर्व तरूण पिढी सावरकरांबरोबर उभी राहिली. त्यामुळेच सावरकरांची सुटका झाल्यावर, जेव्हा त्यांनी रत्नागिरी सोडली त्यावेळी तिथल्या नव्वद टक्के घरातून अस्पृश्यता नामशेष झाली होती.
सावरकरांनी पुर्वास्पृश्यांच्या उद्धाराचंही कार्य केलं. त्यांच्या वाड्यावस्त्यात जाऊन त्यांना शिक्षणाचं, स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. गादीचे कारखाने, बांगडया भरणं, वाजंत्री पथकं असे व्यवसाय त्यांच्यासाठी सुरु करून दिले. त्यांच्यासाठी उपाहारगृह सुरु केली. सावरकर स्वत: तिथे जाऊन बसत असत आणि सवारनी त्या उपाहारगृहांचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करत.
पुर्वास्पृश्यांची सावलीही टाळली जात होती त्या काळात त्यांनी सहभोजनं सुरु केली. त्या भोजनाला उपस्थित असणार्यांची स्वाक्षरी घेतली जात असे. त्यांची नावं वर्तमानपत्रात छापली जात असत. सावरकरांनी, पत्नी यमुनाबाईंच्या सहकार्यानं, स्त्रियांना एकत्र आणण्यासाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केले.
वेद ही कोणा विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही तर जो वेद शिकेल तो वेद सांगण्याचा अधिकारी या विचारानं त्यांनी पूर्वास्पृश्य मुलांना वेदपठण शिकवलं, त्यांना वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धातून भाग घ्यायला लावला आणि त्या मुलांनी या स्पर्धा जिंकल्याही.
आणि कट्टर हिदुत्ववादी धर्मांध ?
अशा या जातीपातीविरुद्ध लढणाऱ्या सावरकरांवर कट्टर धर्मांध हिंदुत्ववादी असल्याचा आरोपही होतो!
मुळात हिंदू हे कट्टर, धर्मवेडे नसतातच. तसं असतं तर आज पाकीस्थान, बांगलादेश येथून धर्मांध मुस्लिमांच्या अत्याचाराला बली पडून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या तेथील अल्पसंख्य समाजातील व्यक्तींसोबत असे अत्याचार करणाऱ्या मुस्लीम घुसखोरांनाही भारताचे नागरिकत्व मिळायला हवं म्हणून हिंदूच भांडले नसते.
हिंदू कट्टर असते तर आज अशी राष्ट्रद्रोही आंदोलने करण्याची आणि १५ कोटी मुस्लीम १०० कोटी हिंदूंना संपवून टाकतील अशी भाषा करण्याची कोणाची हिंमतच झाली नसती.
सावरकर हिंदुत्ववादी जरूर होते पण त्याच वेळी ते त्याकाळचे एकमेव धरनिरपेक्ष नेते होते आणि आहेत. सावरकरांना कुठल्याच धर्माचं अवडंबर मान्य नव्हतं. इतकाच नव्हे तर ‘वसुधैव कुटुंबकम’ हे समस्त मानवजातीचे अंतिम ध्येय हवे अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्यांचे हे विचार पचवण्याची आपलीच कुवत नाही हे सत्य आहे.
हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष? हि काय भानगड?
या साठी मुळातूनच जाणून घ्यावे लागेल सावरकरांचं हिंदुत्व!
त्यांनी हिंदू या शब्दाची अगदी साधी, सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, “आसिंधू सिंधुपर्यँता यस्य भारतभूमीका पितृभू पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृत:।”
म्हणजे सिंधूनदीपासून सिंधुसागरापर्यंत पसरलेल्या भारतभूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू.
पितृभू म्हणजे ज्यांची ही वडिलोपार्जित भूमी आहे आणि पुण्यभू म्हणजे ज्या ज्या धर्मपंथांचा जन्म या भारतभूमीत झाला आहे त्या पंथाचे अनुयायी म्हणजेच वैदिक, सनातनी, आर्यसमाजी, जैन, बौद्ध, शीख, लिंगायत हे सारे हिंदूच.
सावरकरांचा इतिहासाचा अभ्यास होता. आपण हिंदू म्हणून एकत्र येऊन कधी लढलो नाही त्यामुळे आपण पराभूत होत होतो हे जाणून सावरकरांनी विचारपूर्वक हिंदू या शब्दाची व्याख्या केली. सावरकरांचं हे सर्वसमावेशक हिंदुत्व मानलं तर समाजातली तेढच नाहीशी होऊन राजकारण्यांना आपली पोळी भाजता येणार नाही आणि त्यामुळेच त्यांच्या हिंदुत्वाच्या या भूमिकेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलं. अजूनही दुर्लक्षच तर केलं जात आहेच पण त्यांनाच कट्टरपंथीय ठरवण्यात येत आहे.
सावरकरांच्या या व्याख्येतून ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू आणि पारशी यांना हिंदू म्हणून वगळण्यात आले हा आक्षेप नेहमी घेण्यात येतो! पण मग मुस्लीम आणि ख्रिश्चन यांची तयारी होती का स्वत:ला हिंदू म्हणून घ्यायची? आणि आजही आहे आहे का? ज्यू आणि पारशी मंडळी आपल्यात पूर्णपणे मिसळून गेली आहेत. त्यामुळे त्यांना वेगळं मानण्याची आवश्यकता नाही. त्या समाजाचा आपल्याला काहीच त्रास नाही उलट यांचा आपल्या देशाच्या जडणघडणीत अतिशय मोलाचा वाटा आहे.
पण ख्रिश्चन आणि मुस्लिम यांची पुण्यभू हिंदुस्थान नाही, त्यामुळे ते सावरकरी व्याख्येनुसार हिंदू नाहीत. मुस्लिम समाजाच्या निष्ठा या मक्केशी असतात तर ख्रिश्चन मंडळींच्या निष्ठा या व्हॅटिकनशी असतात. तरीसुद्धा सावरकरांनी हे स्पष्ट केलं की जर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी आपापल्या धर्माचा आग्रह सोडला तर मीही हिंदू धर्माचा आग्रह धरणार नाही.
पण आजही यांनी भारतभूमीला आपण सर्वश्रेष्ठ मानतो असे सांगितले आणि सावरकरी व्याख्येनुसार आम्हालाही हिंदू माना अशी मागणी केली तर आम्हीही यांना हिंदू मानण्यास तयार आहोत! पण असे हे सांगतील का? पण तरीही आम्ही यांना भारताचे नागरिक मानतो, समान अधिकार देतो. पण विरोध आहे तो धर्माच्या आधारावर भेदभाव करून गैर-हिंदूंना अधिक अधिकार देण्यास!
सावरकर म्हणतात, ‘श्रुतिस्मृतिपुराण- कुराण- बायबल’ आदी सर्व धर्मग्रंथ कपाटात ठेवावेत आणि केवळ इतिहास ग्रंथ म्हणून त्यांचा अभ्यास करावा. आजच्या घडीला काय योग्य ते ठरवण्याचा अधिकार समाजाचा आहे, धर्मग्रंथांचा नाही. धर्म हा घरात पाळावा, रस्त्यावर आणू नये. संसदेत प्रवेश करताना प्रत्येक लोक प्रतिनिधीनं आपापला धर्म, पंथ, जातपात बाजूला ठेवून भारतीय नागरिक म्हणून प्रवेश करावा हे सांगणारे सावरकर धर्मनिरपेक्षच ठरतात.