आरोप
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना सहकार्य केलं, नेताजी बोस यांना विरोध केला.
वस्तुस्थिती
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. त्यामागची भूमिका समजून न घेता त्यांना रिक्रुटवीर, ब्रिटिशांचे एजंट म्हणून हिणवलं गेलं आणि आजही तेच आरोप त्यांच्यावर होत आहेत.
ब्रिटिशांच्या सैन्यात शिरून सैनिकी शिक्षण घेतल्यावर त्या नियोजनबद्ध शिक्षणाचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठीही होईल पण वेळ येताच बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची ते आपल्या हाती असेल हा त्यामागचा धोरणी विचार तर त्यामागे होता.
ब्रिटिश राजवटीत, ब्रिटिश सैन्यात हिंदूंचे प्रमाण सुमारे पस्तीस टक्के होतं. सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळे ब्रिटिश सैन्यातील हिंदू सैनिकांची संख्या वाढून पासष्ट टक्क्यांवर पोहोचली. भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली ही वस्तुस्थिती असल्याने सगळ्या मुस्लीम पलटणी पाकिस्तानात सामील झाल्या.
जर सावरकरांनी हिंदुनी सैन्यात भरती व्हावे हि मोहीम राबवली नसती तर तेव्हा मुस्लीम सैन्य बहुसंख्य असते आणि त्यामुळे पाकिस्ताननं दुसर्याच दिवशी आक्रमण करून, संपूर्ण भारतावरच कब्जा मिळवला असता.
१९४८ मध्ये पाकिस्ताननं काश्मीरवर आक्रमण केलं पण आपण सैन्यबळात जराही कमी पडलो नाही. खरंतरकेवळ या एका दूरगामी विचारासाठी सुद्धा सार्या देशानं त्यांचं ऋणी रहायला हवं. पण आपण त्यांच्यावरच दोषारोप करत आहोत.
स्वातंत्र्यवीर सावरकर काही जपानी बुद्धभिक्षूंच्या द्वारे जपानमध्ये असलेले थोर भारतीय क्रांतिकारक आणि आझाद हिंदसेनेचे संस्थापक रासबिहारी बोस यांच्या संपर्कात होते. जग पुन्हा महायुद्धाच्या उंबरठयावर उभे असल्यानं महायुद्धात योग्यवेळी सैनिकी उठाव घडविण्याची त्यांची योजना होती. असे प्रयत्न पहिल्या महायुद्धात पण झाले होते आणि त्यात सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संघटनेच्या सदस्यांचा सहभाग होता. अशा कटांचे स्पष्ट पुरावे कधीच नसतात, पण परिस्थितीजन्य पुराव्यांनी ते सिद्ध करता येते.
२१ मार्च १९४२ यादिवशी रासबिहारी बोस रेडिओवरून बोलताना सावरकरांना उद्देशून म्हणाले, “तुमच्या सारख्या ज्येष्ठ सहकारी योद्ध्याला प्रणाम करणे, हे माझे कर्तव्य असल्याचे मी समजतो. भारतीय राजनीती ही कधीही परकीय देशाच्या नीतीवर अवलंबून नसावी आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असावा, या धोरणाचा पुरस्कार करून आपण आपली थोरवी पुन्हा सिद्ध केली आहे.”
२५ जून १९४४ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद रेडिओवरून बोलताना म्हणाले, लहरी आणि भ्रामक राजकीय विचार आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे आज बहुतांश काँग्रेस नेते भारतीय सेनेच्या सैनिकांना भाडोत्री म्हणून हिणवत असताना वीर सावरकर निर्भयतेने भारतीय युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, ही समाधानाची बाब आहे. याच सैनिकांमधून आपल्या भारतीय राष्ट्रीय सेनेला प्रशिक्षित सैनिक मिळत आहेत.
त्याचप्रमाणे या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर जपानमधील क्रांतिकारक आणि आझाद हिंदसेनेचे संस्थापक रासबिहारी बोस यांच्या संपर्कात असल्याचे निर्विवाद पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार, सावरकरांनी सुरु केलेल्या सैन्यभरतीला रासबिहारी बोस यांचे समर्थन असल्याचे सिद्ध होते. रासबिहारी बोस यांनी मार्च आणि एप्रिल १९३९ मध्ये ‘दाई आजिया शुगी’ या जपानी मासिकात सावरकरांचे चरित्र लिहिले आहे. या चरित्राचे शीर्षक आहे, ‘सावरकर – नव्या भारताचा उगवता नेता – कर्तृत्व आणि व्यिेमत्व.’ या लेखात सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाची आणि हिंदुत्ववादाची ओळख जपानी जनतेला करून देताना त्यांनी लेखाच्या शेवटी काढलेला निष्कर्ष महत्वाचा आहे. लेखाचा शेवट करताना ते म्हणतात, “तुम्ही सावरकरांच्या विचारांशी सहमत झालात तरच तुम्ही राजकीय दृष्टीने सामर्थ्यशाली बनाल. सावरकरांचे हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्थान अढळ आहे.”
नुकतेच दिल्ली येथील इंदिरा गांधी विश्वविद्यालयाचे प्रो. कपिलकुमार यांना आझाद हिंद सेनेतील काही सैनिकांचे जबाब आणि पत्रे मिळाली असून, त्यानुसार ते सर्व, सावरकरांच्या सांगण्यानुसार सैन्यात भरती होऊन नंतर आझाद हिंद सेनेला मिळाले हे स्पष्ट होते.