आरोप
सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांना दुराचारी म्हटले.
वस्तुस्थिती
सावरकरांच्या काळात संभाजी राजांवर फारसं संशोधन झालेलं नव्हतं. ते दुराचारी होते अशीच वर्णने तत्कालीन सर्व इतिहास ग्रंथात होती. त्यामुळे तसा काही उल्लेख सावरकरांनी केला असेल तर सावरकरांना दोषी ठरवता येणार नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांवर एक लेख लिहिला आहे- ‘हुतात्मा छत्रपती’. या लेखात सावरकर लिहितात: ‘मराठी सिंहाला आपला पाळीव कुत्रा करणे अशक्य आहे असे पाहून औरंगजह्राने ‘काफरा’चा वध करण्याची आज्ञा दिली. पण या धमकावणीचा शिवाजी महाराजांच्या पुत्रावर थोडाच परिणाम होणार होता! तापवून लाल केलेल्या सळ्यांनी आणि सांडसांनी त्यांचे डोळे भोसकून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या जिभेचे क्रमश… तुकडे तुकडे करण्यात आले. पण या राक्षसी छळानेही त्या राजहुतात्म्याच्या धैर्याचा भंग झाला नाही. अंती त्याचा शिरच्छेद करण्यात आला. मुसलमानांच्या धर्मवेडाला ते बळी पडले पण त्यांनी हिंदूजातीला अक्षय्य उज्वल्लता आणून दिली! ह्या एका आत्यंतिक आत्मयज्ञाच्या कृत्याने संभाजी महाराजांनी महाराष्ट्रधर्माचे – हिंदू पुनरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचे – आत्मस्वरूप जसे विशद करून दाखविले तसे दुसरे कशानेही दाखविणे शक्य नव्हते. संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही, पण संभाजीने आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि अध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेक पटींनी उज्वलतर आणि बलशाली केली. हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचे ह्याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले.
सावरकरांचे कृतिशील अनुयायी श्रीकृष्ण पुरुषोत्तम गोखले, यांच्या पत्नी डॉ. कमल गोखले यांनी डॉक्टरेटच्या पदवीच्या प्रबंधासाठी ‘छत्रपती संभाजी’ हा विषय निवडला होता. संभाजीराजांविषयी ठराविक पुस्तकी माहितीच्या पलीकडे कोणाचेच विचार जात नव्हते. इतिहास हा सावरकरांचा आवडीचा विषय असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी गोखले पतीपत्नी सावरकरांना भेटायला गेले. सावरकरांनी आस्थेनं त्यांची चौकशी केली आणि कमलताइरना विचारले, दारूच्या व्यसनाने आणि कलुशा कब्जीच्या फितुरीने, संगतीने संभाजीने आपला घात करून घेतला हे खरे आहे का? तेव्हा कमलताई म्हणाल्या की, अजून माझा अभ्यास चालू आहे. तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले, संभाजीराजांनी जे धैर्य नि शौर्य दाखविले ते काही एखादया गोमागणेशाचे काम नाही, हे विसरू नको. संभाजी जर दारुडा असता,आणि इतिहासात आपण वाचतो तितका स्त्रीलंपट असता तर हे धैर्य त्याने दाखवले असते असे वाटत नाही. बाई आणि बाटली बाळगणार्या माणसाच्या हातून हिंदूंच्या इतिहासात चिरंतन स्थान मिळावे असे दिव्य होणारच नाही. उघडया डोळयांनी हौतात्म्याचा स्वीकार करणे हे येरागबाळ्याचे काम नाही. तू त्याविषयी सखोल अभ्यास कर आणि सत्य शोधून काढ.