गांधी हत्या झाली. गांधी हत्येचा आरोप ठेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय हत्या करण्यात आली. आता तर गलिच्छ, घाणेरड्या, उबग आणणार्या राजकारणासाठी सावरकरांची रोजच हत्या केली जात आहे.
गांधीहत्येत गोवलं जाऊन स्वतंत्र भारतात, लाल किल्ल्यात सावरकरांना बंदिस्त करण्यात आलं तेव्हा आणि त्यांच्या अंतापर्यंत त्याच कारणासाठी होत राहिलेली मानहानी सावरकरांना अंदमानातल्या यातनांपेक्षा क्लेशकारक वाटली असेल. खरंच स्वर्ग अस्तित्वात असेल तर त्यांच्यावर सध्या घातले जाणारे निर्दयी घाव, त्यांना लाल किल्ल्यातल्या कैदेपेक्षाही अधिकच दु:सह वाटत असतील.
देश हाच देव आणि देश हाच धर्म मानणार्या, केवळ राष्टहिताचा विचार करणार्या सावरकरांचे दोन प्रकारचे हत्यारे आहेत. एक आहेत ते म्हणजे ज्यांना देशाशी, समाजाशी काहीही देणंघेणं नाही. त्यांना केवळ सत्ता मिळवायची आहे आणि स्वत:च्या तुंबड्या भरायच्या आहेत. दुसरे हत्यारे आहेत ते म्हणजे स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे जातीयवादी.
ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरदार, तारुण्य पणाला लावलं त्याच देशातल्या नागरिकांनी मृत्यूनंतरही अवहेलना करावी हा कृतघ्नपणा आहे. सावरकरांचे सगळे विचार, सगळ्यांना पटणारे नाहीत, झेपणारेही नाहीत. त्यांचे विचार पटत नसतील तर ते स्वीकारण्याची कोणी जबरदस्ती केलेली नाही. पण किळसवाण्या राजकारणासाठी त्यांचे मृत्यूनंतरही पदोपदी लचके तोडण्याचा अधिकारही आपल्याला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमीच उपयुक्तता वादाचा पुरस्कार केला. त्यानुसार त्यांचे राष्टहिताचे विचार आणि समाजहिताचे विचार स्विकारता येतील की पण मग सावरकरांची दूरदृष्टी मान्य करावी लागेल ही विरोधकांची खरी अडचण आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अजब रसायन होतं. त्यांनी म्हटलं होतं, माझे विचार तुम्हाला पन्नास वषारनी पटतील. सावरकरांच्या आत्मार्पणाला पन्नास वषारहून अधिक काळ लोटला आहे पण सावरकरांना जाणून घेण्यात आपणच कमी पडतो आहोत. सावरकरांवर केल्या जाणार्या आरोपांबाबत वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न. अर्थात झोपी गेलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्यांचं काय करणार??