आरोप
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्ये गेल्यानंतर मानसिकरित्या खचले होते आणि त्यांनी एका मागोमाग एक माफीपत्रं पाठविली, ही बाब सगळ्यांपासून लपवून ठेवली; तसेच त्यांना कोलू आदी कुठल्याही कठोर शिक्षा झाल्या नव्हत्या.
वस्तुस्थिती
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी युरोप आणि रशियात झालेल्या अनेक क्रांत्यांचा अभ्यास करत भारतात काय आणि कसं कार्य झालं पाहिजे याची आखणी केली होती. गनिमी काव्यानं कसं लढावं याचं संपूर्ण मार्गदर्शन युवकांना व्हावं या हेतूनं इटलीच्या क्रांतीचे उद्गाते जोसेफ मॅझिनी यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद १९०६ मध्ये लंडनमध्ये पोहोचताच सावरकरांनी केला. त्या पुस्तकाला सावरकरांनी लिहिलेली प्रस्तावना क्रांतिकारकांची गीता ठरली.
जोसेफ मॅझिनींना देखील अटक करून तुरुंगात डांबलं होतं आणि सावरकरांच्या प्रमाणेच त्यांनी काही अटींचा स्वीकार करून स्वत:ची सुटका करून घेतली होती. परंतु तरीही जोसेफ मॅझिनी आज इटलीचे श्रेष्ठ क्रांतिकारक मानले जातात आणि त्याच इटलीहून इथं आलेली एक बाई आणि तिची मुलं मात्र सावरकरांना माफीवीर म्हणत त्यांचा अपमान करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी इटलीत जाऊन जोसेफ मॅझिनींना माफीवीर म्हणण्याची हिंमत दाखवावी!
सावरकरांचा माफीनामा हा एक मुद्दा घेऊन सावरकरांना सतत बदनाम केलं जातं.
आपल्या कुठल्याही मागण्यांसाठी अर्ज किंवा याचिका दाखल करण्याचा अधिकार हा प्रत्येक कैद्याला असतो आणि त्या अर्जांनाच दयेचा अर्ज असं संबोधलं जातं. मुळात दयेचा अर्ज (Mercy Petition) करणं ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र फाशीची शिक्षा झालेले कैदी असा अर्ज करण्यास अपात्र होते. त्यामुळे फाशीची शिक्षा झालेल्या एकाही कैद्यानं असे अर्ज केले नाहीत.
सावरकर अंदमानात पोहोचले आणि त्यांनी त्यांच्यावर होणार्या अन्यायाबद्दल, सुविधा मिळण्याबद्दल आणि सर्वच क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी अनेक अर्ज केले. ही सर्व माहिती त्यांनी लपविलेली नाही तर स्वत:च ‘माझी जन्मठेप’ या आत्मवृत्तात लिहिली आहे. परंतु या आवेदनपत्रांत कुठेही सावरकरांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली नाही आणि पश्चातापही व्यक्त केला नाही.
सावरकर बॅरिस्टर होते. त्यामुळे त्यांनी वकीलीबाण्यानं आपल्या सुटकेसाठी कायद्याच्या चौकटीत प्रयत्न केला. यात गैर ते काय होते? का सावरकर आणि अन्य क्रांतीकारांनी अंदमानातच मरून जावे अशी या विकृत कॉग्रेसी मंडळींची इच्छा होती?
कुठल्याही प्रकारे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटणं आणि पुन्हा लढा उभारणं, हे प्रत्येक क्रांतिकारकाचं कर्तव्य आहे, हे सावरकरांचं मत होतं. सावरकर आपलं हे मत अंदमानात असलेल्या क्रांतिकारकांपुढे वारंवार मांडत. याला पुरावा म्हणजे थोर क्रांतिकारक सच्चिंद्रनाथ संन्याल यांचे कथन. लाहोर कटाच्या खटल्यात त्यांना जन्मठेपेची सजा झाली होती आणि सावरकरांप्रमाणेच वचनपत्र देऊन ते सुटले. नंतर त्यांनी पुन्हा जोमानं क्रांतिकार्य सुरू केलं आणि प्रसिद्ध काकोरी कटाचे सूत्रधार म्हणून त्यांना पुन्हा जन्मठेपही झाली. आपल्या बंदी जीवन या आत्मचरित्राच्या पान २२६ वर ते म्हणतात, “सावरकरांनी केलेल्या अर्जात माझ्याप्रमाणेच सहकार्याचे वचन दिले होते, परंतु माझी सुटका झाली पण त्यांची का नाही?… कारण सरकारला अशी भीती होती की, सावरकरांची सुटका झाली तर महाराष्ट्रात पुन्हा बंडाचा भडका उडेल.”
सावरकरांनी अनेक अर्ज केले. परंतु त्यात कुठेही पश्चाताप किंवा माफी नाही. १९१३ च्या अर्जात आम्हाला एकतर राजकीय बंदी हा दर्जा द्या, नाहीतर सामान्य बंदिवानांप्रमाणे सवलती द्या आणि हे शक्य नसेल तर भारतात अथवा ब्रह्मदेशातील तुरुंगात पाठवा ही मुख्य मागणी आहे. या अर्जात सावरकरांनी ब्रिटिशांवर ते क्रांतीकारकांना अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे. असे आरोप कोणीतरी माफीपत्रात करेल का?
ऑक्टोबर १९१४ मध्ये महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या अर्जात शेवटी ते लिहितात, मी जे लिहिलं आहे त्याबाबत सरकारच्या मनात शंका असेल तर मला अजिबात मुक्त करू नये. पण इतर सर्वांना मात्र सोडावे.
५ ऑगस्ट १९१७ या अर्जाच्या शेवटी सावरकर लिहितात, ‘जर सरकारला हे सर्व मी माझ्या मुक्ततेसाठी लिहित आहे असं वाटत असेल किंवा सर्वांच्या सुटकेत माझं नाव असणं हाच मुख्य अडथळा असेल तर माझं नाव गाळावं. मला माझ्या सुटकेनं जितकं समाधान मिळेल तितकंच समाधान मला इतरांच्या सुटकेनं मिळेल. या राजबंद्यांबरोबरच भूमिगत असलेल्या, स्वत:च्या मातृभूमीपासून दुरावलेल्या क्रांतिकारकांनाही परत येण्याची संधी मिळावी.’
ब्रिटिश दस्तावेजात या अर्जांना स्पष्टपणे “Petition for General Amnesty for all the political prisoners” असं संबोधलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगात खचले होते की नाही आणि सावरकरांनी सुटकेच्या अर्जात लिहिलेला मजकूर हा त्यांच्या व्यूहरचनेचा भाग होता की नाही, हे बघायचे असेल तर त्यासाठी जेलमध्ये त्यांच्याबरोबर शिक्षा भोगत असलेले क्रांतिकारक आणि तुरुंगाच्या नोंदी तपासणं आवश्यक आहे. सावरकरांबरोबर तुरुंगात असलेले क्रांतिकारक उल्लासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंह आझाद आणि रामचरण शर्मा या प्रसिद्ध क्रांतिकारकांनी आपल्या आत्मचरित्रात केलेले सावरकरांचे उल्लेख वस्तुस्थिती स्पष्ट करणारे आहेत.
उल्लासकर दत्त यांना प्रचंड छळामुळे वेडाचा झटका आला होता. त्या आधी त्यांना जेव्हा हातकडीत टांगून ठेवलं होतं. तेव्हा तापाच्या भरात त्यांना भास झाला. त्यात जेलर बारीने त्यांना द्वंद्व युद्धाचे आव्हान दिल्यानंतर सावरकर त्यांच्या वतीने लढतात आणि बारीचा पराभव करतात. (१२ years in prisonlife – page ६४-६५) आता अगदी भ्रमात असतानादेखील सावरकरच आपल्यासाठी लढण्यास योग्य आहेत, या उल्लासकर दत्त यांच्या विश्वासातून सावरकरांचं मनोबल १९१२ मध्ये कसं होतं, हे सिद्ध होतं.
१९१३ मध्ये सुराज्य पत्राचे संपादक रामशरण शर्मा यांना संपात भाग घेतल्याबद्दल जेव्हा सजा वाढविण्याची धमकी जेलरनं दिली तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, “यदि विनायक सावरकर ५० वर्ष काट सकते हैं, तो मैं भी काट लूंगा।” (काला पानी का ऐतिहासिक दस्तऐवज पृष्ठ ५३) म्हणजेच १९१३ मध्ये सुद्धा क्रांतिकारक सावरकरांकडे एक आदर्श म्हणूनच बघत होते.
१९१९ मधल्या संपाबद्दल अंदमानमध्ये सजा भोगत असलेले महान क्रांतिकारक भाई परमानंद आपल्या ‘आपबीती’ या चरित्रात म्हणतात की, जेलमध्ये झालेल्या कुठल्याही संघर्षासाठी जेलर बारी आणि पर्यवेक्षक, सावरकर बंधूंनाच जबाबदार धरत असत. (आपबीती – पृष्ठ १०२)
१४ नोव्हेंबर १९१३ चा अर्ज देताना सावरकरांनी सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्याशी व्यक्तिगत चर्चा केली होती. हा अर्ज सरकारकडे पाठविताना आपल्या २३ नोव्हेंबर १९१३ च्या अहवालात सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावरकरांबद्दल काढलेले निष्कर्ष अत्यंत महत्वाचे आहेत. ते म्हणतात,
“……सावरकरांचा अर्ज हा दयेचा असला तरी त्यात त्यांनी कुठेही खेद अथवा खंत व्यक्त केलेली नाही. पण त्यांनी आपला दृष्टीकोन बदलला असल्याचा दावा केला आहे. १९०६-१९०७ मध्ये असलेल्या परिस्थितीमुळे आपण कट रचला असे त्यांचे म्हणणे आहे. पण आता सरकारने विधिमंडळ, शिक्षण इत्यादी अनेक बाबतीत सुधारणा करण्याचा सलोख्याचा दृष्टीकोन अवलंबला असल्याने क्रांतिकारी मार्ग अनुसरण्याची गरज नाही असे त्यांचे म्हणणे आहे.”
“….सावरकरांच्या बाबतीत त्यांना इथे कुठलीही मोकळीक देणे शक्य नाही आणि माझ्या मते ते कुठल्याही भारतीय तुरुंगातून पळून जातील. ते इतके महत्वाचे नेते आहेत की युरोपातील भारतीय अराजकतावादी त्यांना सोडविण्यासाठी कट रचून तो अल्पकाळात अमलातही आणतील. त्यांना जर सेल्युलर जेल बाहेर, अंदमानात धाडले तर त्यांची सुटका निश्चित आहे. त्यांचे मित्र सहजतेने एखादे भाडयाचे जहाज जवळपास लपवू शकतील आणि थोडे पैसे पेरून त्यांच्या सुटकेसाठी उर्वरित बाबी सहज शक्य करतील.”
“…..सावरकरांसारख्या माणसाला अगणित काळ कठोर परिश्रमाचे काम देता येणार नाही. त्यांच्या लागोपाठ भोगावयाच्या शिक्षेचा पन्नास वर्षाचा कालावधी त्यांना आयुष्यभर तुरुंगात ठेवण्यासाठी पुरेसा आहे. काही वर्षांचे कठोर परिश्रम त्यांच्या अपराधासाठी दंड म्हणून पुरेसा होईल आणि ते बाह्य समाजाला धोकादायक असल्याने उर्वरित काळात त्यांना तुरुंगातच बंदिवास भोगावा लागेल.”
सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी हे निष्कर्ष काढण्याला आधार होता तो ऑगस्ट १९१३ च्या ब्रिटिश गुप्तचर विभागानं दिलेल्या अहवालाचा. B-August १९१३ no. ६१ या अहवालात, मादाम कामा, अंदमानात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अमेरिका, जर्मनीतील क्रांतीकारकांच्या सतत संपर्कात असल्याचं स्पष्ट नमूद केलं आहे.
२३ नोव्हेंबर १९१३ ला क्रांतिकारक आणि जर्मन सरकार यांच्यातला दुवा म्हणून कार्य करणार्या एका व्यक्तीला ब्रिटिशांनी अटक केली. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रात सेल्यूलर जेलवर हल्ला करून तेथील क्रांतिकारकांना सोडवून त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हदेशात उठाव करण्याच्या योजनेचा संपूर्ण तपशील होता. यानुसार शेकडो क्रांतीकारक ब्रह्मदेशात जमा झाले होते. या कागदपत्रांमध्ये अंदमानद्वीप तसंच सेल्युलर जेलचे नकाशे, तिथं काम करणार्या अधिकार्यांची नावं, पहारेकर्यांच्या चौक्या आदी सविस्तर माहिती होती. सेल्युलर जेलमधून ज्यांना सोडवायचं होतं त्या क्रांतिकारकांच्या यादीत पहिलं नाव होतं ते सावरकर बंधूंचं.
क्रांतिकारकांना सोडविण्यासाठी सर्वप्रथम १९१४ मध्ये जर्मनीच्या एम्डेन या युद्धनौकेनं अंदमानची नाकेबंदी केली. परंतु त्यावेळी एच एम एस सिडनी या अधिक प्रगत ब्रिटिश युद्धनौकेनं एम्डेन वर हल्ला करून ती कोको बेटानजीक बुडविली.
रासबिहारी बोस यांचे निकटचे सहकारी सच्चिंद्रनाथ संन्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रासबिहारी बोस यांनी आणखी एक नौका डिसेंबर १९१५ मध्ये अंदमानाच्या दिशेनं पाठविली होती. यावेळी हिंदुस्थानी क्रांतिकारकांना निकोबार बेटावर उतरवून रात्रीच्या वेळी अंदमानवर हल्ला करण्याची योजना होती. त्याशिवाय दोन नौका युद्धसामग्रीसह भारताच्या दिशेनेदेखील रवाना झाल्या होत्या. परंतु ब्रिटिश गुप्तचर खात्याला या संपूर्ण कटाची माहिती मिळाली असल्यामुळे शस्त्रं घेऊन जाणारी एक नौका जप्त करण्यात आली. दुसर्या नौकेचे काय झाले याची माहिती उपलब्ध नाही. परंतु अंदमानच्या दिशेने जाणारी नौका, एचएमएस कॉर्नवेल या ब्रिटिश युद्धनौकेने डिसेंबर १९१५ च्या शेवटच्या आठवड्यात बुडविली. याचवेळी शस्त्रास्त्रं घेण्यासाठी निघालेले बंगालचे क्रांतिकारक जतींद्रनाथ मुखोपाध्याय (बाघा जतीन) यांना सप्टेंबर १९१५ मध्ये बालासोर इथं त्यांच्या दोन साथीदारांसोबत चकमकीत मारण्यात आलं.
याच दरम्यान भारतीय सैन्यात उठाव करण्याची योजना देखील उघडकीस आली. विष्णू गणेश पिंगळे यांनी रासबिहारी बोस, सच्चिंद्रनाथ संन्याल, कर्तार सिंग सराबा यांच्या साथीनं उठाव करण्याची मोठी योजना आखली होती. ब्रिटिशांनी इंडियन डिफेन्स अॅक्ट अंतर्गत कारवाई करून पिंगळे आणि कर्तार सिंग या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली. इतर क्रांतिकारकांना दीर्घ मुदतीच्या शिक्षेवर अंदमानला पाठवण्यात आलं.
ब्रह्मदेशात कार्यरत असलेल्या सात क्रांतीकारकांना फाशी देण्यात आलं तर आठ जणांना अंदमानला जन्मठेपेवर धाडण्यात आलं.
भारतात अंतर्गत उठाव करून त्याच वेळी ब्रह्मदेशातून भारतावर आक्रमण करण्याची ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना होती. भारतातील आणि परदेशातील सर्व क्रांतिकारी संघटनांनी एकत्र येऊन हाती घेतलेली ही सर्वात मोठी मोहीम होती. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांना अंदमानातून सोडवून बर्मा(थायलंड) येथे न्यायचं आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली आधी बर्मा आणि मग ब्रह्मदेश ताब्यात घेऊन तिथून भारतावर उघड आक्रमण करायचं अशी ही महत्वाकांक्षी योजना होती.
दुर्दैवानं अपयश आलं असलं तरीही या योजनेचं महत्व वादातीत आहे. यासाठी अविरत कार्यरत असलेले असंख्य अनाम क्रांतीकारक देशोधडीला लागले, हुतात्मा झाले. त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे काय झाले याची साधी वार्ताही नव्हती. त्यांच्या हजारो वीर माता, वीर पत्नी आपला मुलगा, आपला पती कधी परत येईल या प्रतीक्षेत जगत राहिल्या. पण दरवाज्यावर होणारी प्रत्येक थाप त्यांचा अपेक्षा भंग करत राहिली! परंतु आज मात्र इतक्या महत्वाकांक्षी योजनेची, या क्रांतिकारकांच्या बलिदानाची आणि या वीर माता, वीर पत्नींच्या असामान्य त्यागाची साधी माहिती देखील कोणाला नसावी हे दुर्दैवी आहे. आज गोडवे गायले जातात ते केवळ राजप्रासादात सुखाने भोगलेल्या बंदिवासांचे! पत्नी आजारी असतानाही, आपल्या दुराग्रहापोटी- तिच्यावर आधुनिक उपचार न करू देता- तिला मृत्युमुखी धाडणाऱ्या तथाकथित महात्म्यांचे आणि त्यांच्या विकृत सत्याच्या प्रयोगांचे!!
सगळे ब्रिटीश अहवाल हेच सिद्ध करतात की स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानात अमानुष यातना भोगत असताना देखील युरोप, अमेरिका येथील भारतीय क्रांतिकारकांच्या मदतीनं क्रांतीच्या योजना आखत होते.
सावरकर हे बॅरिस्टर होते त्यामुळे त्यांनी स्वत:च्या सुटकेसाठी वकिली आयुधांचा वापर केला. तसंच प्रत्येक अर्जाच्या वेळच्या देशातल्या, जगातल्या परिस्थितीचा आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी उपयोग केला.
सावरकरांनी आणि त्यांचे बंधू नारायणराव यांनी केलेल्या अर्जांमुळेच, सावरकर बंधू सोडून इतर क्रांतिकारकांना काही सुविधा मिळाल्या, शेकडो क्रांतिकारकांची सुटका झाली पण सावरकर बंधूंची सुटका व्हायला मात्र १९२१ हे वर्ष उजाडावं लागलं. तोपर्यंत वीर सावरकरांना कुठलीही सवलत ब्रिटिशांनी दिली नाही की त्यांची कोठडीबंदी चुकली नाही.
अंदमानातून सुटलेला प्रत्येक क्रांतिकारक हा राजकारणात भाग न घेण्याची अट मान्य करूनच सुटला आहे. तसेच १९३१ ला काँग्रेस नेत्यांवरील खटले मागे घ्यावेत यासाठी संपूर्ण आंदोलनच गांधी- नेहरूंनी मागे घेतलं होतं आणि १९३५ साली तुरुंगातून सुटताना अशीच अट नेहरूंनी स्वीकारली होती.
आता इतकं असतानाही केवळ राजकारणात भाग न घेण्याची अट मान्य करून सुटका करून घेतली म्हणून सावरकरांना माफीवीर म्हणणार का?
सावरकरांनी जेलमध्ये कुठलेही कष्ट भोगले नाही, असा एक बिनबुडाचा आरोप काही जण करतात. परंतु अंदमानमध्ये १९१६ ते १९२१ मध्ये शिक्षा भोगत असलेले महान क्रांतिकारक पृथ्वीसिंह आझाद यांचा अनुभव काही वेगळंच सांगतो.
“वीर सावरकर ने आधुनिक भारत के युवकों को क्रांती का पाठ पढाया था। क्रांतिकारी वृत्तीवाले नवयुवकों के वे तेजस्वी नेता थे। ऐसे सामर्थ्यशाली व्यक्ती से अंग्रेज अधिकारियों ने वह काम लिया जो बैलोंसे लिया जाता था। तेल के कोल्हू पर प्रतिदिन तिस पौंड तेल निकालने के लिए सावरकर को मजबूर किया गया।” (क्रांति के पथिक – पृष्ठ १०८)
पृथ्वीसिंह आझाद भारतात परत आल्यानंतर, ब्रिटिशांच्या कैदेतून निसटल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहान बंधू नारायणराव सावरकर यांनीच त्यांना आसरा दिला होता. (क्रांति के पथिक- पृष्ठ १५३) त्यानंतर भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा सूड म्हणून पृथ्वीसिंह आझाद आणि सुप्रसिद्ध महिला क्रांतिकारी दुर्गाभाभी व्होरा यांनी जेव्हा १९३० मध्ये लॅमिंग्टन पोलिस ठाण्यावर गोळीबार केला, तेव्हा त्यांच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विश्वासू सहकारी आणि क्रांतिकारक गणेश रघुनाथ वैशंपायन होते. (क्रांति के पथिक – पृष्ठ १९०) हेच गणेश रघुनाथ वैशंपायन हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचेही निकटचे सहकारी होते. (क्रांति के पथिक- पृष्ठ १८४)
म्हणजे पृथ्वीसिंह आझाद, उल्लासकर दत्त, भाई परमानंद, रामचरण शर्मा आणि सच्चिंद्रनाथ संन्याल यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांचा प्रत्यक्ष अनुभव खोटा आहे, असं सावरकर विरोधकांना म्हणावयाचं आहे का?
सध्या उपलब्ध असलेल्या सावरकरांच्या कारागृहातील नोंदीवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठोठावण्यात आलेल्या अमानवीय शिक्षा आणि सावरकरांचे वागणं याची माहिती होईल. पण यात कोलू ओढल्याची नोंद नाही म्हणून सावरकरांनी कोलू ओढलाच नाही असा बिनबुडाचा आरोप काही भाडोत्री लेखक करतात. पण कोलू ओढणे हे नियमित काम होते, शिक्षा नव्हे; त्यामुळे हा उल्लेख येथे नसणे स्वाभाविक आहे. ब्रिटीश गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक हेच सांगतात. आता काय काय शिक्षा सावरकरांना झाल्या ते पहा!
१. तुरुंगात पोहचल्यानंतर ११ व्या दिवशी दिनांक १५ जुलै १९११ या दिवशी त्यांना सहा महिने कोठडी बंद करण्यात आले.
२. १५ जानेवारी १९१२ या दिवशी त्यांची कोठडी बंदी संपली.
३. ११ जून १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ कागद सापडल्याबद्दल १ महिना एकांतवास.
४. १९ सप्टेंबर १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ दुसर्याला लिहिलेले पत्र सापडल्याबद्दल सात दिवसांची खडी हातबेडी
५. २३ नोव्हेंबर १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ दुसर्याला लिहिलेलं पत्र सापडल्याबद्दल एक महिन्याची एकांतवासाची शिक्षा.
६. ३० डिसेंबर १९१२ ते २ जानेवारी १९१३ या कालावधीत अन्नत्याग.
७. १६ नोव्हेंबर १९१३ या दिवशी रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्याशी भेट झाली आणि त्यानंतर काम करण्याचे नाकारल्याबद्दल एक महिन्याची एकांतवासाची शिक्षा.
८. ८ जून १९१४ या दिवशी काम करण्यास नकार दिल्यामुळे सात दिवस हातबेड्या घालून उभे राहण्याची शिक्षा.
९. १६ जून १९१४ या दिवशी काम करण्यास नकार दिल्यामुळे चार महिने साखळदंडाची शिक्षा.
१०. १८ जून १९१४ काम करण्यास संपूर्ण नकार दिल्यामुळे दहा दिवस खोडा बेडीची शिक्षा.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देण्यात आलेल्या अनेक शिक्षा या बेकायदेशीर असल्यामुळे त्याची नोंद झाली नाही असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात स्पष्टपणे म्हटलं आहे आणि इतर क्रांतिकारकांच्या आत्मचरित्रातही हे स्पष्ट केलं गेलं आहे. वरील अपूर्ण दस्तऐवज बघतानाही सावरकरांना किती कठोर शिक्षा झाल्या होत्या, याची झलक मिळते. सावरकरांना अंदमान मध्ये पोहोचल्यावर लगेचच ६ महिने एकांतवासात ठेवले होते. ही शिक्षा किती भीषण आणि अमानवीय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातील वागणूक कशी होती याबद्दल १९१९ मधील एक अहवाल म्हणतो “त्यांची वागणूक नम्र असली तरीही त्यांनी स्वत:हून सरकारला सहकार्य करण्याची प्रवृत्ती कुठेही दाखविली नाही. त्यांचे खरे राजकीय विचार काय आहेत, हे यावेळी सांगता येणे कठीण आहे.” सावरकर हे अजूनही धोकादायक कैदी असल्याने सावरकरांना सार्वत्रिक माफीचा लाभ देऊ नये, असा निर्णय मुंबई प्रांतिक सरकारनं या अहवालाच्या आधारे घेतला होता.
रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्यापुढे तथाकथित विनंतीअर्ज सादर केल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर हे लगेच संप पुकारतात आणि त्याबद्दल त्यांना एक महिन्याची एकांतवासाची शिक्षा होते आणि त्यानंतरही अनेकदा ते काम नाकारून खडाबेडी, दंडाबेडी, एकांतवासाची शिक्षा भोगतात, हे त्यांच्या कणखर स्वभावाचं निर्विवाद निदर्शक आहे.
यानंतरही सावरकरांच्या मनोधैर्याबद्दल कुणाच्या मनात काही शंका असल्यास त्याचं निराकरण करणारा अस्सल पुरावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळाला आहे. अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं हस्तलिखित प्रकाशात आलं असून त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उर्दूत लिहिलेल्या तीन देशभक्तीपर रचना आहेत. १९२१ मधल्या या हस्तलिखितातील रचना युवकांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचं आवाहन करतात. यातील एक गीत सच्चिंद्रनाथ संन्याल यांच्याद्वारे काकोरी कटातील आरोपींपर्यंत पोहोचलं असावं. तुरुंगात जी देशभक्तीपर गीतं हे क्रांतिकारक गात, त्यात सावरकरांची “यही पाओगे…” ही गझल समाविष्ट होती. (काकोरी के दिलजले, पृष्ठ ११२) सावरकरांनी उर्दूत लिहिलेल्या एका रचनेत ते म्हणतात,
“हंता रावणका हैं अपना राम वीरवर सेनानी,
कर्मयोग का देव हैं स्वयं कृष्ण साऱथी अभिमानी।
भारत तेरे रथ को सेना कौन रोकने वाली हैं,
फिर देर क्यूं, उठो भाई हम ही हमारे वाली हैं॥”
१९१० मध्ये अंदमानला जाण्याआधी लिहिलेल्या “पहिल्या हप्ता” या कवितेत हेच भाव व्यक्त झाले होते आणि ११ वर्षाच्या कठोर कारावासानंतरही सावरकरांचे विचार तीळमात्र बदलले नव्हते, हेच सावरकरांच्या हस्तलिखितावरून निर्विवाद सिद्ध होतं.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटकेबद्दल स्पष्ट भूमिका
आपली सुटकेचा अर्ज करण्यामागची भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वत: आपल्या भावाला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे. हे पत्र तुरुंगाधिकारी तपासून मगच पाठवत असल्यानं सावरकरांची भूमिका सरकारला माहित होती. त्याच प्रमाणे या पत्रातील मजकूर लगेचच वर्तमानपत्रात छापून आला आणि त्याची नोंदही पोलिसांनी घेतली. त्या पत्रातला काही भाग देत आहोत.
पोर्ट ब्लेअर,
दिनांक ६-७-१९२०
प्रियतम बाळ,
…अखेर राजक्षमेची आज्ञा आली. शेकडो बंदी कारागृहातून मुक्त होत आहेत. मुख्यत: ज्यांनी राजकीय बंद्यांच्या मुक्ततेसाठी असंख्य स्वाक्षरींच्या अर्जाची योजना केली, त्याला पाठिंबा दिला, त्याच्यावर संमत्या घातल्या त्या आपल्या पुढाऱ्यांच्या आणि देशबांधवांच्या, त्यातही मुख्यत: बाँबे नॅशनल युनियनच्या अनवरत परिश्रमांचे हे फळ आहे. इतक्या थोडया अवकाशात चांगल्या पाऊण लाख लोकांच्या नावाने पाठवलेल्या प्रचंड अर्जाचा सरकारच्या मनावर विलक्षण परिणाम झाला असलाच पाहिजे मग ते कितीही नाकारीनात. निदान त्या अर्जाने राजकीय बंद्यांची आणि त्यामुळे ज्या कार्यासाठी ते लढले व हरले त्या कार्याची नैतिक प्रतिष्ठा वाढवली यात शंका नाही. आता खरोखर आमची सुटका व्हावयाचीच असेल तर तिच्यात काही तरी अर्थ वाटेल. कारण आम्ही त्यांच्यात परत यावे अशी इच्छा आमच्या देशबांधवांनी प्रदर्शित केली आहे. त्यांनी आमच्यासाठी जी काळजी आणि सहानुभूती दाखविली त्यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी थोडे आहेत. त्यांच्या जितक्या आत्मीयतेला आम्ही पात्र आहो असे आम्हाला प्रामाणिकपणाने वाटते त्यापेक्षा त्यांनी आमच्याविषयी अधिक आत्मीयता आणि आदर दाखविला आहे आणि त्यांचे प्रयत्न अगदीच व्यर्थ गेले नाहीत. कारण जरी आम्ही दोघे या क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आम्हांला या कोठडीत खितपत पडावे लागते आहे, तरी आपल्या सांगाती कष्ट सोशीत असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणार्या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हांला वाटतात; आणि त्यामुळे गेली आठ वर्षे इथे आणि इतरत्र संप, पत्रे, अर्ज यांच्या द्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली तिचे आम्हांला फळ मिळाल्याचे समाधान वाटते.
… ता. २-४-१९२० ला मी राज्यकर्त्यांनी नुकत्याच दिलेल्या या क्षमादानाच्या प्रश्नासंबंधी नवीन अर्ज सरकारकडे पाठविला आहे. त्या अर्जात सरकारने हे जे शेकडो राजकीय बंदी सोडले आणि अशा रीतीने माझा १९१८ चा अर्ज अंशत: मान्य केला त्यासाठी पहिल्याने आभार मानले आहेत आणि मग अद्यापही बंधनात असलेल्या आणि त्याप्रमाणेच राजकीय कारणासाठी परदेशात अडकून पडलेल्या अशा सर्वांना लाभ मिळेल अशा रीतीने या क्षमादानाची मर्यादा वाढवली पाहिजे अशी विनंती केली आहे.
… सरकारने आपला दृष्टिकोण पालटला आहे आणि भरतवर्षाला स्वातंत्र्य, सामर्थ्य अणि पूर्ण चैतन्य यांच्या मार्गाने सशस्त्र प्रतिकार न करता पुढे जाणे शक्य करण्याची त्याची इच्छा आहे असे ऐकून मला आनंद वाटला. माझा विश्वास आहे की, खरोखर अशी परिस्थिती असल्यास माझ्याप्रमाणेच इतरही पुष्कळ क्रांतिकारक आपले पाऊल जेथल्या तेथे थांबवतील, या मिळालेल्या सुधारणानंतरच्या विधिमंडळाच्या मोडक्यातोडक्या वाटेवरच्या धर्मशाळेत मानप्रद अशा संधीसाठी इंग्लंडशी हात मिळवावयास सिद्ध होतील आणि पुन: प्रगतीच्या रस्त्यावर पुढे पाऊल टाकावयाची आज्ञा उच्चारली जाईपर्यंत तेथे कामही करतील.
… तेव्हा आम्ही जे क्रांतिकारक झालो ते निरुपाय म्हणून झालो, उल्हासाने नाही. हिंदुस्थानच्या आत्यंतिक हिताच्या दृष्टीने आणि इंग्लंडच्याही हिताच्या दृष्टीने त्यांनी परस्परांच्या साहाय्याने आणि सहकार्याने आपली ध्येये शांततेने आणि क्रमश: प्रगती होऊन गाठणे अवश्य आहे असे आम्हाला तेव्हा वाटे, आणि अद्यापिही जर ते अवश्य असेल तर शांततेच्या उपायाचा अवलंब करण्यासाठी आलेली पहिली संधी मी साधीन आणि प्रत्यक्ष क्रांतीने किंवा अन्य मार्गाने पाडलेल्या घटनानुसार प्रगतीच्या भगदाडात घुसेन आणि उत्क्रांतीच्या सेनेला त्यातून एकसारखे, अडथळा न होता, जाता येईल अशा रीतीने ते भगदाड रुंद करण्याचा प्रयत्न करीन.
सरकारने जर राज्यघटनेत मन:पूर्वक सुधारणा केल्या नि त्या उपयोगात आणल्या आणि त्या सुधारणांमुळे ही असली घटनेची खिंड निर्माण झाली तर मग राज्यक्रांती तेथेच संपेल आणि तिच्या जागी उत्क्रांती हा आम्हांला सर्वांना एकत्र आणणारा शब्द होऊन बसेल. अणि मातृभूमीच्या सेनेतील एक क्षुद्र सैनिक म्हणून मी त्या सुधारणा यशस्वी करण्यासाठी मन:पूर्वक झटेन; म्हणजे त्या सुधारणांचा उपयोग भारताला पुन: स्वतंत्र वैभवशाली आणि थोर बनवून, इतर राष्ट्रांच्या हातात हात घालून किंवा त्यांना मार्ग दाखवून मनुष्यजातीच्या नियत भवितव्याकडे घेऊन जाण्यासाठी करीन.
… या अर्जापासून आमच्या सुटकेच्यासंबंधात विशेष काही होईल अशी आशा करू नकोस. आम्ही आमची आशा कधीच बळावू दिली नाही आणि त्यामुळे सुटका न झाल्यास आम्हाला त्याविषयी विशेष निराशाही वाटणार नाही. काहीही निर्णय झाला तरी तो स्वीकारावयाला आम्ही सिद्ध आहो. तू आपल्याकडून शक्य तितका प्रयत्न केला आहेस आणि मुख्यत: तुझ्या संतत उद्योगाचेच हे फळ आहे की राजकीय बंद्यांच्या मुक्ततेच्या प्रश्नाला इतके तीव्र स्वरूप आले नि आम्हांला दोघांना वगळले तरी उर्वरित शेकडो राजकीय बंद्यांना आपले स्वातंत्र्य परत मिळाले.
तुझी प्रकृती उत्तम असेल अशी आशा करून आणि स्नेह्यांना आणि नातलगांना नमस्कार लिहून हे पत्र पुरे करतो.
प्रिय बाळ,
तुझाच प्रिय तात्या
या पत्रातील मजकूर अन्य वृत्तपत्रांबरोबरच ‘दै. मराठा’मध्ये २५ जानेवारी १९२०ला छापून आल्याची पोलीस नोंद आहे. या बातमीच्या आधारे विधिमंडळात प्रश्न विचारण्यात आले होते.